मार्गावरील खड्ड्याने घेतला वृद्ध महिलेचा बळी ; धानोरा-मुरुमगाव मार्गावरील घटना

मार्गावरील खड्ड्याने घेतला वृद्ध महिलेचा बळी ; धानोरा-मुरुमगाव मार्गावरील घटना

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते नागरिकांच्या जीवावर उठले असतांना संबंधित विभागाने याकडे कायम कानाडोळा केला आहे. अशातच संबंधित प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एका वृद्ध महिलेचा अपघातात बळी गेल्याची घटना धानोरा तालुक्यात उघडकीस आली आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकीवरुन पडून कातांबाई शामलाल मारगिया (62) रा. खेडेगाव या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 12 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास धानोरा-मुरुमगाव मार्गावरील आमपायली गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार खेडेगाव येथील शामलाल मारगिया हे पत्नी कांताबाई यांचेसोबत दुचाकीने धानोराकडे जात होते. दरम्यान धानोरा-मुरुमगाव मार्गावरील आमपायली गावाजवळ त्यांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने कांताबाई दुचाकीवरुन रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी कातांबाईना उपचारार्थ हलविण्यासाठी मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यात आला. मात्र रुग्णवाहिका न आल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. नुकताच धानोरा-मुरुमगाव या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहतूकदारांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे साबां विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच सदर वृद्ध महिलेचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.