बंदूका फेकून पसार होण्याचे प्रकरण ; दोन आरोपींची कारागृहात रवानगी

बंदूका फेकून पसार होण्याचे प्रकरण ; दोन आरोपींची कारागृहात रवानगी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर मार्गावर नाकाबंदीदरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास संशयित दोघांनी दुचाकी जागेवर ठेवित पळ काढला होता. पळतांना त्यांनी हातातील चटई नाल्यात फेकून दिली होती. तपासाअंती त्यात दोन बंदूका आढळून आल्या होत्या. दरम्यान स्थानिक पोलिसांनी त्याच दिवशी उशिरा बाजारवाडी परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रामा गोटा व बैजू गोटा दोघेही रा. एकराखुर्द ता. एटापल्ली अशी आरोपींची नावे आहे. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एटापल्ली-कसनसूर मार्गावर एटापल्लीचे उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात नाकाबंदी सुरु असतांना संशयित दोघांनी दुचाकी रस्त्यावरच उभी करीत पळ काढला होता. पसार होत असतांना त्यांनी हातातील चटई नाल्यात फेकून दिली होती. चटई उघडून बघितले असता त्यात दोन बंदूका आढळून आल्या होत्या. दरम्यान दोघांवरही गुन्हा दाखल करीत स्थानिक पोलिसांनी युद्धस्तरावर शोध मोहिम राबविली होती. दरम्यान बाजारवाडी परिसरातून दोघांनाही ताब्यात घेण्यात यश आले आहे. दोन्ही आरोपींना आज, शुक्रवारी अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावित त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.