झोपेतच युवतीची धारदार शस्त्राने हत्या

झोपेतच युवतीची धारदार शस्त्राने हत्या
– रंगय्यापल्ली येथील घटना

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : घरी खाटेवर झोपून असलेल्या 20 वर्षीय युवतीची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना सिरोंचा तालतुक्यातील रंगय्यापल्ली येथे 13 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ओलिता रामय्या सोयाम रा. रंगय्यापल्ली असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक युवती ओलिता ही रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर झोपी गेली. यादरम्यान आई तिच्याजवळच झोपली होती. तर भाऊ बुचय्या रामया सोयाम हा दुसऱ्या खोलीत झोपला होता. दरम्यान भाऊ बुचय्या सोयाम शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर अंथरुन व पांघरुनचे कपडे ठेवण्यासाठी खोलीत गेला असता बहिण ओलिता सोयाम ही खाटेवर बेशुद्धावस्थेत आढळून आली. यावेळी तिच्या खाटेखाली रक्त सांडल्याचे निदर्शनास आले. त्याने तिला उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती निपचीत पडून होती. यानंतर त्याने आरडाओरड करीत आईला उठविले. घटनेची माहिती गावातील नातलगांना देण्यात आली. दरम्यान ओलिताजवळ पाहिले असता, ओलिताच्या हनुवटीच्या खाली, गळयावर मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात मृतक युवतीचा भाऊ बुचय्या सोयाम याने सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन सिरोंचा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून अज्ञात फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.