मुंबईतील सेलिब्रिटींचे डॉक्टर गडचिरोलीत आदिवासींच्या सेवेत ; सर्चमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया

मुंबईतील सेलिब्रिटींचे डॉक्टर गडचिरोलीत आदिवासींच्या सेवेत ; सर्चमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्चच्या माँ दंतेश्वरी दवाखान्यात मणक्याची शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शस्त्रक्रिया शिबीर गडचिरोली वासीयांसोबतच शेजारच्या छत्तीसगड राज्यातील गरजू लोकांसाठी देखील वरदान ठरत आहे. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपडा, असरानी, अभिनेत्री बिंदू यांच्यासारख्या मुंबईतील सेलिब्रिटींवर उपचार करणारे डॉ. भोजराज आणि डॉ गौरिश केंकरे यांनी शिबिराच्या माध्यमातून गडचिरोलीतील 17 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
धानोरा तालुक्यातील खांबाडा गावात राहणा-या 34 वर्षीय मंथनाला कंबरदुखी, पायाला मुंग्या येणे हा त्रास होता. तिला बसता उठताना भयंकर वेदना होत होत्या. ती पाच मिनीट देखील चालू शकत नव्हती किंवा खाली बसू शकत नव्हती. अखेर मंथनाला चालणे, बसणे अशक्य झाल्यानंतर तिने गावच्याच एका गृहस्थाच्या सांगण्यावरून सर्चचा दवाखाना गाठला. पाच वर्षे कंबरदुखीचा त्रास सहन केल्यानंतर 15 जुलै रोजी तिच्यावर सर्चच्या माँ देंतेश्वरी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईचे प्रसिद्ध सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंथना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्चच्या दवाखान्यातील शस्त्रक्रिया शिबीर गडचिरोलीवासीयां सोबतच शेजारच्या छत्तीसगड राज्यातील गरजू लोकांसाठी देखील वरदान ठरत आहे. मंथना सोबत आणखी 17 रुग्णांवर या शिबीरात मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. छत्तीसगड राज्यातील पखांदूर गावी राहणारी अंजली मिस्त्री, वय वर्षे 47. मुलं लहान लहान असतानाच नव-याने सोडलं. आता दोन्ही मुलं तरूण वयात आलेली आहेत. दोन मुलांची जबाबदारी खांद्यावर घेऊन अंजली अंगणवाडी सेविकेचं काम करते. मात्र तुंटपुंज्या पगारात घर चालत नसल्याने पावसाळ्यात ती धान शेतीचीही कामं करते. तिला मागील पाच वर्षांपासून पाठ दुखीचा त्रास होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेणे तिला परवडणारे नव्हते. गावच्या एका गृहस्थाने तिला सर्चच्या दवाखान्याबद्दल सांगितले आणि ती उपचारासाठी येथे आली.
पार्वती बद्दीया ही देखील पखांदूरचीच. वय वर्षे फक्त 36. मुलगा हवा म्हणून तीन मुलीवर एक मुलगा अशी चार मुलांची तरुण आई. पार्वतीही मागील तीन वर्षांपासून पाठदुखी आणि पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त होती. मंथना, अंजली, पार्वती असो वा सरिता, बबिता या तरुण महिला पाठदुखी, कंबरदुखी, पायात वेदना असे आजार परिस्थिती आणि सुविधांअभावी अंगावर काढत जगत आहेत. अशा सर्व गरजू रुग्णांना सर्चची आरोग्य सेवा वरदान ठरत आहे.
डॉ भोजराज आणि डॉ गौरिश केंकरे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (मानेखालील सर्व शरीराचा लकवा) क्वाड्रिपेरेसीसचे निदान झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया आणि बरे होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉ. भोजराज आणि डॉ. गोरिश केंकरे यांनी बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपडा, असरानी, अभिनेत्री बिंदू यांना देखील बरे होण्यात मदत केली आहे. मुंबईतील सेलिब्रिटींवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर गडचिरोलीच्या आदिवासींना देखील सेवा देत आहेत.

स्पाईन च्या सहकार्याने फिजिओथेरपी व सर्जरी
गडचिरोलीतील गरीब आणि गरजू लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अनेक दशकांपासून डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग सर्चच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे काम करत आहेत. डॉ. अभय बंग यांनी सांगितले, पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही बोलावलेल्या आदिवासी आरोग्य संसदेत कंबर – पाठ दुखणे ही प्रमुख समस्या आदिवासींनी सांगितली. गावांच्या सर्वेक्षणात असं आढळलं की, निम्म्या वयस्कांना हा त्रास आहे. म्हणून सर्चने गावात फिजिओथेरपी व रुग्णालयात सर्जरी असा उपक्रम स्पाईन फाऊंडेशनच्या सहकार्याने विकसीत केला.

छोटे छोटे व्यायाम गरजेचे : डॉ. केंकरे
मुंबईचे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केंकरे म्हणाले की, मणक्याचे विकार, वेदना असह्य झाल्यावर शरिरावर त्याचा ताण येतो. यामुळे माणसाला वाकणे, बसणे, चालणे कठीण होते. परंतू, वेळीच लक्ष दिल्यास आणि घरच्या घरी छोटे छोटे व्यायाम केल्यास हा त्रास आपण कमी करू शकतो. एकाच स्थितीमध्ये दिर्घकाळ न राहता आपली स्थिती बदलत राहिल्याने शरीराच्या एकाच भागावर दुखणे येणार नाही असेही डॉ. केंकरे यांनी सांगितले.

पाठदुखी ही जागतिक समस्या : डॉ. आनंद बंग
डॉ आनंद बंग म्हणाले की, पाठदुखी ही जागतिक समस्या म्हणून समोर आली आहे आणि ती गडचिरोलीतील शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही. आम्ही इथल्या लोकसंख्येसाठी ऊभारलेले फिजिओथेरपी केंद्र अधिक सुव्यवस्थित करत आहोत. हे केंद्र सर्व नवीनतम उपलब्ध साहित्यासह वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केले गेले आहेत. असेही डॉ. आनंद बंग यांनी सांगितले.

मुंबईच्या डॉक्टरांची पेंढरी गावाला भेट
मुंबईच्या डॉक्टरांसह पेंढरी गावाला भेट दिली असता पेंढरी पीएचसीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सखाराम हिचामिया म्हणाले की, प्रत्येक पीएचसीमध्ये फिजिओथेरपिस्टची गरज आहे. शेतीची कामं याव्यतिरिक्त, दुचाकी चालवणे आणि खराब रस्ते या कारणामुळे देखील मणक्याच्या दुखण्याची समस्या उद्भवते तसेच येथील लोकांना मणक्याच्या दुखण्याची समस्या फार गंभीर असल्याचेही ते म्हणाले.

आदिवासींच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष शिबिरांचे आयोजन
पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या नेतृत्वाखाली अविरत सेवा देणा-या सर्चच्या दवाखान्यात आदिवासी आणि आसपासच्या गावातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात येतात. आदिवासींना पूर्वी साध्या तापालाही डॉक्टर मिळत नव्हता. तेथे आदिवासींच्या आरोग्याच्या गरजा ओळखून डॉ. बंग दाम्पत्याने सर्च (शोधग्राम)ची निर्मिती केली. सर्चच्या दवाखान्यात दर महिन्याला विविध आजारांवर निदान, उपचार आणि औषधोपचार केला जातो. तर अनेकांना शस्त्रक्रियेची गरज भासते. अशावेळी येथील आदिवासींच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष शिबीरे घेण्यात येतात. या शिबीरासाठी नागपूर, मुंबईहून तज्ञ डॉक्टर येतात.