मुसळधार पावसाचा फटका ; उद्या जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये राहणार बंद

मुसळधार पावसाचा फटका ; उद्या जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये राहणार बंद

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : पुरस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा सीमाक्षेत्रातील सर्व शाळा, विद्यालय, अंगणवाडी, महाविद्यालये 22 जुलै रोजी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले आहे. यापूर्वी 20 जुलै ला सुद्धा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
सध्या मान्सून कालावधी सुरु असून मागील ५ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली आहे. गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहे. तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैद्राबाद द्वारा आज २१ जुलै प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील २४ तासाकरिता गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तेलंगाणा राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करुन मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे. या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये २२ जुलै रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहे.