गुप्तधनाची लालच दाखवून पोलिस पाटलाला लुटले

गुप्तधनाची लालच दाखवून पोलिस पाटलाला लुटले

GADCHIROLI TODAY

-दोन भामट्यांना अटक
-रेगडी पोलीस मदत केंद्र हद्दीतील घटना
चामोर्शी : कुकर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या दोन भामट्यांनी गुप्तधनाची लालच दाखवून पोलिस पाटील व त्याच्या कुटुंबीयांची २ लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार चामोर्शी तालुक्यातील पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील अतीदुर्गम गरंजी टोला येथे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांची दोन भामट्याना अटक केली असून एकाच शोध सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, गरंजी टोला येथील पोलीस पाटील चैतू हिचामी यांच्या संपूर्ण कुटुंबाला गुप्त धन काढून देण्याचे आमिष दाखवून घराच्या खाली २२ किलो सोने असल्याची खोटी माहिती देत कुकर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या दोन भामट्यांनी पोलीस पाटील चैतू हिचामी व त्यांचा मुलगा हरिदास हिचामी याला विश्वासात घेतले. सोने काढून देतो त्यासाठी एका बनावट पुजाऱ्या मार्फत आष्टी येथील एका दुकानातून १६ हजार रुपयांचे पूजेचे साहित्य खरेदी करून दिले. त्यानंतर पोलीस पाटलाच्या घरी जाऊन पूजा केली. अर्धवट पूजा करून खोटे सोन्याचे शिक्के कुटुंबाला दाखवले व आणखी सोने जमिनीखाली असून ते काढण्यासाठी दोन लाख सत्तर हजार रुपयांचे पूजेचे साहित्य खरेदी करावे लागेल, ते नाही केल्यास कुटुंबातील एका सदस्याला जीव गमवावा लागेल अशी भीती आदिवासी कुटुंबाला दाखवली. त्याप्रमाणे चैतू हिचामी यांच्या कुटुंबाने व्याजाने दोन लाख सत्तर हजार रुपयांची जुळवा जुळव केली. त्या खोट्या पुजारी व इतर एकाने हरिदास हिचामी यास सदरची रक्कम गडचिरोली येथे घेऊन येण्यास सांगून पैसे घेऊन हरिदासला एक पांढऱ्या रंगाची पावडर देऊन ती पावडर घरातील पूजेवर टाकायला सांगितली. हरिदासने पुजाऱ्याने सांगितल्या प्रमाणे सर्व पुजाविधी करूनही सोने बाहेर आले नाही तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पोलीस मदत केंद्र रेगडी येथे तक्रार दाखल केली.
रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे यांनी गुन्हा दाखल करून लगेच कसून तपास सुरु केला. सतत तीन दिवसांच्या परिश्रमानंतर चंद्रपूर येथे एक पुरावा हाती लागला. त्याच्या साहाय्याने आरोपी पर्यंत पोहचून त्या तीन भामट्यापैकी दोघांना पोलिस उप निरीक्षक नंदकुमार शिंब्रे व त्यांच्या पथकाने एक मोटार सायकल, दोन मोबाईल व दोन लाख सत्तर हजार रुपयांसह अटक केली आहे. आणखी एका फरारी आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उप अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिक्षक गडचिरोली साहिल झरकर, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक यशवंत वलथरे, पोशी प्रेमकांत बोडावार, रमेश कड्यामी, रमेश दंडिकेवार, सागर म्हेत्रे यांनी केली.