वाघाच्या हल्ल्यात गाय गंभीर ; परिसरात दहशत

वाघाच्या हल्ल्यात गाय गंभीर ; परिसरात दहशत
– नागपूर चक येथे घटना
GADCHIROLI TODAY

चामोर्शी : चामोर्शी वनपरिक्षेत्रातील सोनापुर जंगलात पट्टेदार वाघाने जनावरांच्या कळपावर हल्ला करून एका गायीला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
चामोर्शी वनपरिक्षेत्रातील सोनापुर खंड क्र. 362 मध्ये वामन रायशिडाम नामक गुराखी हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी गावातील जनावरे चरावयास घेवून गेला. दरम्यान सायंकाळच्या सुमारास झुडूपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने जनावरांच्या कळपावर हल्ला चढविला. यात नागपूर चक येथील ईश्वर परशुराम मेश्राम यांची गाय गंभीर जखमी झाली. गुराख्याने घटनेची माहिती गाय मालकाला दिली. ईश्वर मेश्राम यांनी याची माहिती वनविभागाला देताच चामोर्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वांडिघरे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक अशोक लिंगमवार, वनरक्षक जे. ए. निमसरकार आदींनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. गंभीर जखमी गायीवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम यांनी औषधोपचार केला.
जंगल परिसरात वाघाने शिरकाव केल्याने शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चामोर्शी नियत क्षेत्राअंतर्गत गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी शेतात व जंगलात जाताना अधिक सतर्क रहावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वांडिघरे, क्षेत्रसहाय्यक अशोक लिंगमवार यांनी केले आहे.