दोन परप्रांतीयांकडून दीड क्विंटल गांजा जप्त ; असरअल्ली पोलिसांची कारवाई

दोन परप्रांतीयांकडून दीड क्विंटल गांजा जप्त ; असरअल्ली पोलिसांची कारवाई
GADCHIROLI TODAY

गडचिरोली : छत्तीसगड राज्यातून चारचाकीने गांज्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोन परप्रांतीयांना अटक करून तब्बल २० लाख रुपये किंमतीचा दीड क्विंटल गांजा व चारचाकी जप्त केल्याची कारवाई असरअल्ली पोलिसांनी सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली ते पातागुडम मार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळ आज २३ जुलै रोजी केली. शिव विलास नामदेव व ज्योती सत्येंद्र वर्मा, दोन्ही रा. उत्तरप्रदेश असे आरोपींचे नाव आहेत.
छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने गांजा असरअल्ली कडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने असरअल्ली पोलिसांनी असरअल्ली ते पातागुडम रोडवरील फॉरेस्ट नाक्याजवळ सापळा लावला. दरम्यान एका वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहन रोडच्या खाली उतरवून वाहनातील एक महिला व एका पुरुषाने पळ काढला. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने दोघांना पकडले. त्यानंतर कारची पाहणी केली असता, कारच्या मागील डिक्कीमध्ये १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १५ लाख व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन क्र. एम एच ३४ ए एम ५५०१ अंदाजे किंमत ५ लाख असा एकुण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिव विलास नामदेव व ज्योती सत्येंद्र वर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेश गावडे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे यांच्या नेतृत्वात पोअं जगन्नाथ कारभारी, पोअं दिलीप ऊईके, पोअं शंकर सलगर, पोअं आदिनाथ फड यांनी पार पाडली.