पुन्हा हत्तींचा धुमाकूळ ; 30 एकरातील उभे पीक जमीनदोस्त

पुन्हा हत्तींचा धुमाकूळ ; 30 एकरातील उभे पीक जमीनदोस्त

GADCHIROLI TODAY

कुरखेडा : लहान-मोठे मिळून 25-26 हत्ती असलेल्या कळपाने तालुक्यातील चारभट्टी शेतशिवारातील तब्बल 30 एकरातील उभे पीक जमीनदोस्त केल्याने बळीराजा चिंताचुर झाला आहे. सध्या हत्तींचा कळप पुराडा वनपरिक्षेत्रात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी शेतशिवारात रात्री 1 वाजताच्या सुमारास हत्ती दाखल झाल्याचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी टेंभे, टॉर्च घेवून रात्रीच शेत गाठून हत्तीच्या कळपाला रात्री उशिरापर्यंत शेतशिवारातून जंगलात हाकलून लावले. मात्र तोपर्यंत हत्तींनी जवळपास 14 शेतकऱ्यांच्या 30 एकरातील धानपीक व बांधातील पाळ्यांचे नुकसान केले होते. मागील वर्षीही हत्तींच्या कळपाने या परिसरातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा हत्तींचा कळप परिसरात दाखल झाल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात गेलेला हत्तींचा कळप पुन्हा भ्रमंती करीत कुरखेडा तालुक्यात दाखल झाला आहे. या कळपात जवळपास लहान-मोठे मिळून 25-26 हत्ती आहेत. वनविभागाचे पथक कळपाच्या मार्गावर आहे. सध्या हत्तींचा कळप पुराडा वनपरिक्षेत्रात असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
चारभट्टी येथील शेतकरी सूर्यभान हर्षे, भागवत निंबेकर, फकीरा सोनबोईर, सोनाली मारगाये, जनकलाल भैसारे, पुसाऊ आडील, मनोहर आडील, भाऊराव तिरगम, केवळराम नाट, करंगसू कवडो, सूरेश कवडो, पतीराम कवडो, आनंदराव तिरगम, जांभूळकर या शेतक-यांचे धानपीक हत्तींच्या कळपाने पायदळी तुडवल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नूकसानग्रस्त शेतीची माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष परसराम नाट, वासूदेव निंबेकर, भास्कर किंचक यांनी पाहणी केली. नूकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक शेंडे, वनरक्षक काशीवार, वनमजूर विट्ठल मांडवे, मधूकर दरवडे यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करीत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवत असल्याचे सांगितले.