स्फोटकासह नक्षली साहित्य जप्त ; गडचिरोली व बिजापूर पोलिसांची संयुक्त कारवाई

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर स्फोटकासह नक्षली साहित्य जप्त ; गडचिरोली व बिजापूर पोलिसांची संयुक्त कारवाई

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : छत्तीसगड व गडचिरोली पोलिसांनी छग राज्यातील भोपालपट्टनम पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात असलेल्या नक्षल्यांचे शिबिर उध्वस्त करीत घटनास्थळावरुन स्फोटकासह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात छत्तीसगड राज्यातील नॅशनल पार्क एरिया कमिटीचे 20 ते 25 नक्षली दबा धरुन असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 16 ऑगस्टला भोपालपट्टनम पोलिसांचे डीआरजी दल तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम पोलिस ठाण्यातील सी-60 पथकाचे जवान संयुक्तरित्या जंगलात रवाना करण्यात आले. सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास नक्षली व जवानांमध्ये अंधाधूंद गोळीबार सुरु झाला. सदर चकमक 15 ते 20 मिनीट चालली. जवानांचा वाढता दबाव लक्षात घेत नक्षली जंगलात पसार झाले. घटनास्थळी शोध मोहिम राबविली असता स्फोटके, डिटोनेटर, जिलेटीन, पिट्टू तसेच जीवनावश्यक साहित्यांसह पुस्तके आढळून आली. पोलिसांनी सदर साहित्य जप्त केले. चकमकीनंतर नक्षली साहित्यांसह संयुक्त पथक मध्यरात्रीच्या सुमारास भोपापट्टणम येथील कॅम्पमध्ये पोहचले. बिजापूरच्या भोपालपट्टणम येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी दिली.